इंदापूर समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : पुणे, अहिल्यानागरसह सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा जलसाठा निम्म्यावर आला आहे. जसजशा उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत, तशी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची गरज वाढू लागली आहे. उपसा सिंचन, उन्हाळी आवर्तन व पिण्याच्या पाण्यासाठी कालव्याच्या व भीमानदीपात्रातून भरमसाठ पाणी सोडण्यात येत आहे .परिणामी, उजनी धरण्याच्या उपलब्ध पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. त्यामुळे उजनी जलाशयातील पाण्याचे तातडीने व काटेकोरपणे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. दरम्यान, दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी शेतकरी, लोकप्रतिनिधी टाहो फोडतात, परंतु यश येत नाही. त्यामुळे या परिस्थितीला जबाबदार असलेली कालवा सल्लागार समिती नेमके करते काय? याप्रश्नी शेतकरीवर्ग सध्या आक्रमक आहे.
यावर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे जिरायती भागासह बागायती क्षेत्रातील शेतकरी सुखावला होता. गेल्या वर्षी दुष्काळाच्या झळा सोसणारा शेतकरीवर्ग सध्यातरी समाधानी आहे.परंतु जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात उजनी धरणाच्या पाणी पातळीत कमलीची घट झाली आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणीसाठा पन्नास टक्क्यांपर्यंत खाली आला आहे . या परिस्थितीमुळे ऐन उन्हाळ्यात उजनीच्या पाण्याचा उन्हाळा होण्यास उशीर लागणार नाही अशा प्रकारची चिंता उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना वाटत आहे.
दौंड तालुक्यातील भीमा नदीची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने उजनी धरणग्रस्त शेतकरी चिंताग्रस्त आहे . उपसा सिंचन, कालवा सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचे योग्य व फेरनियोजन करणे गरजेचे आहे . याप्रश्नी दौंड ,इंदापूर,कर्जत व करमाळा तालुक्यातील लोक प्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे.