ग्रामीण अर्थव्यवस्थेला आर्थिक स्थैर्य व पोषण सुरक्षा देणारी पशुगणना
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क –
भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये पशुपालन ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे लाखो कुटुंबांना आर्थिक स्थैर्य आणि पोषण सुरक्षा मिळण्यास मदत होते. पशुपालन हा कृषी कुटुंबासाठी पूरक उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्त्रोत आणि भूमिहिन कुटुंबासाठी उत्पन्नाचा प्राथमिक स्त्रोत आहे. पशुधनाच्या संख्येबाबत सर्वसमावेशक माहिती गोळा करण्यासाठी पशुगणना हे महत्त्वाचे साधन आहे.
देशामध्ये १९१९ सालापासून पशुगणनेला सुरुवात करण्यात आली. दर पाच वर्षातून एकवेळेस ही पशुगणना करण्यात येते. आतापर्यंत २० पशुगणना करण्यात आल्या असून २१ व्या पशुगणनेला नोव्हेंबर २०२४ पासून सुरुवात करण्यात आली असून पशुधन क्षेत्र सुधारण्यासाठीच्या कार्यक्रमांचे योग्य नियोजन सुसूत्रीकरण, अंमबजावणी आणि देखरेख सुलभीकरणाची ही गणना मोलाची मदत करणारी ठरणार आहे.

पशुधन क्षेत्राला उद्योग म्हणून विकसित करण्यासाठी शासनामार्फत सक्रियपणे काम करण्यात येत आहे. पशुधन आणि कुक्कुटपालनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी, रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अनुवंशिकदृष्टया सुधारित प्राणी घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. जनुकीय सुधारित पशुधन जातींची उपलब्धता वाढविणे, रोग नियंत्रणाचे उपाय वाढविणे, शेतकऱ्यांमध्ये जनुकीय सुधारित प्राणी दत्तक घेण्यास प्रोत्साहन देणे आणि विमा किंवा भरपाई योजनांसारख्या स्थापन केलेल्या यंत्रणेद्वारे नुकसानीपासून संरक्षण प्रदान करणे हे या योजनांची उद्दिष्ट आहे. आर्थिक सहाय्याव्यतिरिक्त शासन पशुपालक शेतकऱ्यांमध्ये प्रशिक्षण, विस्तार सेवा आणि आधुनिक पशुपालन पद्धती आणि तंत्रज्ञान उपलब्ध करुन क्षमता निर्माणावर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यादृष्टीनेही भारतातील पशुधनाच्या संख्येबाबत सर्वसमावेशक माहिती गोळा करण्यासाठी ही पशुगणना एक महत्वाचे साधन आहे.
पशुगणनेद्वारे विविध पशुधन प्रजातींची लोकसंख्या, त्याची जात, वय आणि लिंग यासह तपशीलवार आणि अचूक माहिती गोळा करण्यावर भर दिला जातो. पशुगणनेच्या माहितीचे विश्लेषण पशुधन क्षेत्रातील कल, नमूने आणि आव्हाने ओळखण्यास मदत करते. ही माहिती लक्ष देण्याची आवश्यक असलेल्या क्षेत्रांना ओळखण्यासाठी आणि विशिष्ट समस्यांचे निराकरण करण्यासाठी लक्षित हस्तक्षेपांची रचना करण्यासाठी मौल्यवान आहे. पशुधन गणनेतून प्राप्त माहिती विविध प्रदेश आणि समुदायांना त्यांच्या पशुधन लोकसंख्येवर आणि गरजांवर आधारित निधी, पायाभूत सुविधा आणि सेवा यासारख्या संसाधनांचे वाटप करण्यास मदत करते. हे महत्त्व लक्षात घेतल्यास सुरू असलेल्या पशुगणनेत सहभाग घेवून पशुधनाची माहिती प्रगणकांना देणे पशुपालकांच्या हिताचेच आहे.
डॉ.सुनिल तुंबारे, पशुसंवर्धन उपायुक्त- जिल्ह्यातील पशुंची गणना करण्याची मोहीम २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून या गणनेत गाय वर्ग, म्हस वर्ग, शेळी – मेंढी, अश्व, वराह यांच्यासह बिल्ला लावलेल्या व न लावलेल्या जनावरांची व भटक्या समुदायातील पशुधनाची गणनाही करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात २९५ प्रगणक व ७६ पर्यवेक्षक तर शहरी भागात ५६ प्रगणक व १८ पर्यवेक्षकांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या गणनेचा फायदा पशुपालकांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना राबवितांना होणार असल्याने आपल्याकडील जनावरांची माहिती प्रगणकाला द्यावी.