अपघातग्रस्त युवकाच्या मदतीला शिंदेंची शिवसेना आली धावून.
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – : नान्नज (ता. जामखेड) येथील युवक विठ्ठल मोहोळकर आठ दिवसांपूर्वी जामखेड येथे भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विठ्ठल मोहोळकर यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने उपचाराचा खर्च मोठे आव्हान ठरत होता.

या प्रकरणाची गंभीरता ओळखून शिवसेना तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे यांनी नगर येथे जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव एकनाथ शेलार यांची भेट घेतली व संपूर्ण परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली.
एकनाथ शेलार यांनी तात्काळ दखल घेत मंगेश चिवटे यांच्याशी संपर्क साधून संबंधित मदतकार्याला गती दिली. त्यानंतर शासकीय व प्रशासकीय यंत्रणा तातडीने कार्यरत होऊन अपघातग्रस्त युवकाला आवश्यक मदत मिळण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू करण्यात आल्या.
नितीन कोल्हे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे व सामाजिक जाणिवेमुळे एका गरीब कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल जामखेड तालुक्यातून कौतुक होत असून, अशा समाजहित जपणाऱ्या कार्यकर्त्यांची आजच्या काळात नितांत गरज असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

