जामखेड तालुक्यातील मांजरा नदीवरील मोठ्या पुलासाठी नाबार्डकडून ८ कोटींचा निधी मंजूर
विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – ०८ जानेवारी
जामखेड तालुक्यातील दिघोळ–माळेवाडी ग्रामीण मार्ग क्रमांक २३ वरील मांजरा नदीवरील मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी नाबार्डच्या माध्यमातून ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार व सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून, जामखेड तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

पुलाचे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा.ना. प्रा. राम शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येत राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधीअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत राज्यातील रस्ते विकास व पुलनिर्मितीसाठी एकूण १,५०० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली. त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ५०० कोटी रुपयांच्या १६१ कामांसाठी नाबार्डकडे शिफारस करण्यात आली होती.

यामध्ये जामखेड तालुक्यातील दिघोळ–माळेवाडी मार्गावरील मांजरा नदीवरील मोठ्या पुलाच्या बांधकामाचा समावेश आहे.
या पुलासाठी ८ कोटी रुपये (अक्षरी रुपये आठ कोटी फक्त) निधी उपलब्ध झाल्याने नाबार्डची कार्यवाही पूर्ण होताच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. पुलाच्या उभारणीमुळे परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी, वाहतूकदार व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.
या महत्वपूर्ण निधी मंजुरीबद्दल स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा.ना. प्रा. राम शिंदे यांचे आभार मानले आहेत.
