मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी घरोघरी भेटी सुरू; नागरिकांनी सहकार्य करावे- उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क अहिल्यानगर, दि. ३०-भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र वितरित करून ते भरून घेणार आहेत. नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन या प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
यावेळी नायब तहसीलदार सुधीर उबाळे, नायब तहसीलदार कैलास साळुंखे आदी उपस्थित होते.
श्री.पाटील म्हणाले की, २२५ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख १५ हजार २६४ मतदार असून २ लाख २४ हजार ४५२ मतदारांचे मॅपिंग पूर्ण करण्यात आले आहे. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी एकूण २९७ बीएलओ कार्यरत असून ३० पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी ४ सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि ३६ नव्याने सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. बीएलओंना मदतनिस म्हणून आशा सेविका व अंगणवाडी सेविकांचीही नियुक्ती करण्यात आली असून सर्व बीएलओंना २५ जून रोजी प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या ६३१ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण ३० जून रोजी घेण्यात आले. बीएलओ घरी भेट देण्यासाठी आल्यानंतर नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे व माहिती उपलब्ध करून देत सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासाठी १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख निश्चित करण्यात आली आहे. २० ते २९ जून या कालावधीत आवश्यक साहित्याची तयारी, प्रशिक्षण व मुद्रण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून ३०जून ते २९ जुलै या कालावधीत बीएलओ घराघरांत जाऊन गणना प्रपत्राद्वारे माहिती संकलित करणार आहेत.

५ ऑगस्ट २०२६ रोजी मतदार यादीचा प्रारूप (मसुदा) प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. प्राप्त दावे व हरकतींची छाननी व निकाली काढण्याची प्रक्रिया ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर या कालावधीत पार पडेल. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहितीही श्री.पाटील यांनी यावेळी दिली.
