श्रीनागेश्वर पालखी सोहळा जामखेडला उत्साहात संपन्न
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : भक्तिमय वातावरणात टाळ-मृदुंगाचा गजर आणि ‘हर हर महादेव’, ‘ओम नमः शिवाय’, ‘नागेश्वराय शिव नागेश्वराय’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यंदा महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. शुद्ध वारकरी परंपरेनुसार झालेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते.

नागपंचमीच्या निमित्ताने श्रीनागेश्वर महाराजांची यात्रा भरते. गेल्या २३ वर्षांपासून पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. सकाळी शिवलीलामृत पारायणानंतर नगराध्यक्षा सौ. प्रांजलताई अमित चिंतामणी, श्री. अमित चिंतामणी, श्री. गोवर्धन जोरे व सौ. मंगलाताई जोरे यांच्या हस्ते श्रीनागेश्वर महाराजांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर पंचक्रोशीतील भजनी मंडळांच्या उपस्थितीत पालखीमध्ये मुखवटा स्थापन करण्यात आला. ‘तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ’ या अभंगाच्या गजरात पालखीचे प्रस्थान झाले.

श्रीनागेश्वर मंदिरापासून सुरू झालेली मिरवणूक खर्डा रस्ता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, लक्ष्मी चौक, संविधान चौक, श्रीविठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजपेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, जुने कोर्ट, महादेव गल्लीमार्गे वैतरणा नदीतीरावरील नव्या पालखी मार्गाने पुन्हा मंदिरात पोहोचली. दिंडी मंदिरात आल्यानंतर अभंग, आरती व कीर्तन झाले.
विठ्ठल, श्रीनागेश्वर, तपनेश्वर, जमादारवाडी, जगदाळे वस्ती, बोराटे वस्ती, बटेवाडी यांसह पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी सहभाग घेतला. मार्गावर महिलांनी सडा-रांगोळी काढली होती.

यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, नगरसेवक मोहन पवार, संजय काशिद, राजेंद्र गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
पालखी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५१व्या जन्मोत्सवी वर्षानिमित्त ह.भ.प. दीपकजी महाराज यांच्या वाणीतून संत ज्ञानेश्वर माऊली संगीतमय चरित्रकथा सुरू आहे. बुधवारी दि. १९ ऑगस्ट रोजी चेतन महाराज बोरसे यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे.
मुस्लिम पंच कमिटीचे स्वागत
मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखीचे विणेकरी ह.भ.प. संतोष महाराज बारगजे यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी अझहरभाई काझी, हाजी मंजुरअली सय्यद, आबेद खान, इस्माईल सय्यद, हाजी मुख्तार सय्यद यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
