प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देत २० लाखांची खंडणी
श्रीगोंदा पोलिसांकडून तिघे अटकेत; ५४.८० लाखांचा मुद्देमाल जप्त.
श्रीगोंदा समृद्ध नगर न्यूज नेटवर्क -:
प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देत व्हॉट्सअॅपद्वारे २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा श्रीगोंदा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल ५४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात वैभव आसाराम खंडके (वय २७, व्यवसाय, रा. श्रीगोंदा) यांनी फिर्याद दाखल केली होती. १ जानेवारी २०२६ पासून अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली व २० लाख रुपयांची खंडणी मागितली. भीतीपोटी फिर्यादीने १ लाख ५० हजार रुपये दिले. मात्र उर्वरित रक्कम न दिल्याने आरोपींनी पुन्हा धमकी देत खून करण्याचा इशारा दिला.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयित मोबाईल क्रमांकाचा माग काढत आकाश पोपट मोरे (वय २४, रा. टाकळी लोणार) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार बापू विठ्ठल शिंदे (वय ३१) व किरण विठ्ठल शिंदे (वय २९, दोघेही रा. वडाळी रोड, श्रीगोंदा) यांना अटक करण्यात आली.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले तीन मोबाईल फोन व तीन चारचाकी वाहने असा एकूण ५४.८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता २० जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपी व वाहने समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्म व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या पथकाने केली.

