अजितदादांच्या जयंतीला सरकार मोठा निर्णय घेणार?; रोहित पवारांची तीन महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत मागणी
‘चार दिवसांचे कार्यक्रम नकोत; कायमस्वरूपी स्मरण राहील असा निर्णय घ्या’, सरकारसमोर रोहित पवारांची अपेक्षा
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क मुंबई : २२ जुलै रोजी अजितदादांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकार मोठी घोषणा करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे.

अजितदादांच्या न्यायासाठीचा लढा सुरूच राहील, असे स्पष्ट करत रोहित पवार म्हणाले की, सरकारने केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता त्यांच्या कार्याची कायमस्वरूपी आठवण राहील असा निर्णय घ्यावा.

पुणे रिंग रोड, तळेगाव-चाकण-शिक्रापूर एलिव्हेटेड मार्ग आणि पुणे-शिरूर एलिव्हेटेड मार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना अजितदादांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. “अजितदादांच्या मित्राच्या हाती आज सत्ता आहे. त्यामुळे मैत्रीला जागून सरकारने २२ जुलैलाच हा निर्णय घ्यावा,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आता सरकार रोहित पवारांच्या या मागणीला प्रतिसाद देत अजितदादांच्या जयंतीदिनी मोठी घोषणा करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

