बनावट UTRच्या आधारे 41 लाखांची फसवणूक; पाच स्विफ्ट डिझायरसह दोघे जेरबंद
मारुती सुझुकी शोरूमला गंडा; कोतवाली पोलिसांनी पाचही वाहने जप्त केली
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क अहिल्यानगर : बनावट बँक मेसेज, खोटे UTR क्रमांक आणि न वटणारे धनादेश देऊन तब्बल 41 लाख रुपयांच्या पाच नवीन स्विफ्ट डिझायर टी-परमिट कारांची फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. तसेच फसवणुकीत मिळविलेल्या सर्व पाच गाड्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

पवन गुरुनाथ पांडव (वय 38) आणि संतोष त्रिंबक दळवी (वय 44, दोघेही रा. निर्मलनगर, सावेडी, अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 3 जानेवारी 2026 रोजी शिल्पा गार्डनसमोरील महालक्ष्मी ऑटोमोटीव्ह मारुती सुझुकी शोरूममधून पाच नवीन स्विफ्ट डिझायर टी-परमिट गाड्यांची खरेदी केली होती.
यासाठी त्यांनी शोरूम व्यवस्थापनाला बनावट बँक मेसेज आणि खोटे UTR क्रमांक पाठवून 41 लाख रुपयांचे पेमेंट केल्याचा आभास निर्माण केला. त्यानंतर MH 16 DP 3496, 3497, 3498, 3501 आणि 3520 या क्रमांकांच्या गाड्यांची डिलिव्हरी घेतली.

मात्र, शोरूमच्या खात्यात प्रत्यक्षात एकही रुपया जमा झाला नसल्याचे अकाउंट विभागाच्या निदर्शनास आले. याबाबत आरोपींकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी पेमेंटच्या नावाखाली धनादेश दिले; परंतु खात्यात शिल्लक नसल्याने तेही वटले नाहीत. पुढील चौकशीत आरोपींनी पाचपैकी दोन गाड्यांची विक्री केल्याचे समोर आले.
याप्रकरणी शोरूम व्यवस्थापनाने 1 जून 2026 रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तपासाची सूत्रे सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्याकडे सोपविण्यात आली.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींना अटक करून पोलिस कोठडी घेतली. चौकशीदरम्यान तीन गाड्या आरोपींकडून जप्त करण्यात आल्या. तर विक्री करण्यात आलेल्या उर्वरित दोन गाड्या संबंधित धारकांकडून पंचनामा करून ताब्यात घेण्यात आल्या. अशा प्रकारे फसवणुकीत मिळविलेल्या सर्व पाच गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी वाहन विक्री शोरूम चालकांना व्यवहाराची पूर्ण खातरजमा झाल्याशिवाय वाहनांची डिलिव्हरी देऊ नये, असे आवाहन केले आहे. ऑनलाइन व्यवहार, RTGS, DD किंवा धनादेशाद्वारे झालेल्या पेमेंटची खात्री करूनच वाहन ग्राहकांच्या ताब्यात द्यावीत, असे त्यांनी सांगितले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात व त्यांच्या पथकाने केली.
