समृद्ध नगर न्यूज नेटवर्क
‘संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या* *संगीत नाट्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती* अहिल्यानगर, दि. २६ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी माऊली सभागृह, अहिल्यानगर येथे ‘संत कान्होपात्रा’ या संगीत नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले.
संत कान्होपात्रा यांच्या भक्तिमय जीवनाचा वेध घेणाऱ्या या प्रयोगाला संगीतप्रेमी व नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रसिकांच्या उपस्थितीने सभागृहात संगीत नाट्याचा भक्तिरस अनुभवायला मिळाला.यावेळी नाट्यपरिषदेचे श्री. सतीश लोटके, श्री. श्याम शिंदे तसेच नाट्यपरिषदेचे इतर सदस्य उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा हा तिसरा संगीत नाट्य महोत्सव असून, मराठी संगीत रंगभूमीची समृद्ध परंपरा जपणे, तिचा प्रसार करणे आणि नव्या पिढीला या अभिजात कलाप्रकाराची ओळख करून देणे हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.

या महोत्सवाच्या स्थानिक आयोजनासाठी श्रुती संगीत निकेतन, अहिल्यानगर या संस्थेचे सहकार्य घेण्यात आले आहेमहोत्सवाच्या पहिल्या दिवशी सादर झालेल्या ‘संगीत ऊस डोंगा परी’ या प्रयोगानंतर दुसऱ्या दिवशी ‘संत कान्होपात्रा’ या नाटकाने महोत्सवाची रंगत अधिक वाढविली.
संत कान्होपात्रा यांच्या जीवनातील भक्ती, अध्यात्म आणि भावविश्वाला संगीताच्या माध्यमातून रंगमंचावर प्रभावीपणे साकारण्यात आले. अभिजात संगीत, भावपूर्ण गायन आणि प्रभावी अभिनयामुळे प्रयोगाने रसिकांची मने जिंकली.ना. वि. कुलकर्णी लिखित, मास्टर कृष्णराव यांच्या संगीताने आणि श्री. सुरेश साखळकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण बालगंधर्व संगीत रसिक मंडळ, पुणे, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले.
नाटकातील संगीतबद्ध पदे, भक्तिरसपूर्ण प्रसंग आणि कलाकारांचे प्रभावी सादरीकरण यांना रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.संगीत नाटकाची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी, गायकांचे स्पष्ट उच्चार, भावपूर्ण अभिनय आणि अभिजात संगीत यामुळे प्रयोगाला विशेष रंगत आली. भक्ती आणि संगीत यांचा सुरेख संगम साधणाऱ्या या प्रयोगातून संत कान्होपात्रा यांच्या जीवनातील अध्यात्मिक जाणिवांचा प्रभावी प्रत्यय रसिकांना आला.

महोत्सवाचा समारोप गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी ‘संगीत संशय कल्लोळ’ या प्रसिद्ध संगीत नाट्यप्रयोगाने होणार आहे. गो. ब. देवल लिखित आणि श्री. मनोहर जोशी दिग्दर्शित हा प्रयोग खल्वायन, रत्नागिरी यांच्या वतीने सादर करण्यात येणार आहे.संगीत, नाट्य, साहित्य, अभिनय आणि गायन यांचा सुरेख संगम असलेल्या या महोत्सवाला मिळत असलेला प्रतिसाद हा मराठी संगीत नाट्यकलेविषयी रसिकांच्या मनात असलेल्या जिव्हाळ्याचे द्योतक ठरत आहे.
अहिल्यानगर व परिसरातील नाट्यरसिक, संगीतप्रेमी, विद्यार्थी, कलाकार आणि सांस्कृतिकप्रेमींनी महोत्सवाच्या अंतिम दिवशी सादर होणाऱ्या ‘संगीत संशय कल्लोळ’ या प्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

