वृद्ध शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी विशेष प्रक्रिया
बोटांचे ठसे न उमटणाऱ्या लाभार्थ्यांनाही मिळणार कर्जमुक्तीचा लाभ
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क –
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरू असताना वयस्कर तसेच बोटांचे ठसे न उमटणाऱ्या शेतकऱ्यांसमोर येणारे अडथळे दूर करण्यासाठी राज्य शासनाने विशेष प्रक्रिया निश्चित केली आहे. किमान तीन वेळा वेगवेगळ्या बोटांनी प्रमाणीकरणाचा प्रयत्न करूनही आधार प्रमाणीकरण न झाल्यास संबंधित शेतकऱ्याची ओळख तालुकास्तरीय समितीमार्फत निश्चित करून कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

राज्य शासनाने दि. २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, त्यासाठी महाआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. महाआयटीने संगणकीय प्रणालीद्वारे एकूण १६.९६ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी सुमारे १३.४८ लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून उर्वरित लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण सुरू आहे.

दरम्यान, वयामुळे किंवा बोटांचे ठसे स्पष्ट न उमटल्याने अनेक वृद्ध शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शासनाने पर्यायी प्रमाणीकरण प्रक्रिया निश्चित केली आहे.
यानुसार संबंधित शेतकऱ्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्राला भेट देऊन यादीतील विशिष्ट क्रमांकासह आधार कार्ड आणि बँक पासबुक सादर करावे. विशिष्ट क्रमांक किंवा आधार क्रमांकाच्या आधारे पोर्टलवर संबंधित कर्जाची सविस्तर माहिती उपलब्ध होईल. ही माहिती पाहून शेतकऱ्याने मान्य किंवा अमान्य पर्यायाची नोंद केल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने बोटांच्या ठशांचे प्रमाणीकरण करण्यात येईल.

एका बोटाचा ठसा नोंदविला जात नसल्यास वेगवेगळ्या बोटांचा वापर करून किमान तीन वेळा प्रमाणीकरणाचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. तीन प्रयत्नांनंतरही प्रमाणीकरण यशस्वी न झाल्यास आपले सरकार सेवा केंद्र चालकाने ‘प्रमाणीकरण शक्य नाही’ (Unable to Authenticate) हा पर्याय निवडावा. त्यानंतर केंद्र चालकाने स्वतःच्या बोटाद्वारे आधार प्रमाणीकरण करून प्रक्रिया पुढे पाठवावी.
प्रमाणीकरणाची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित तक्रार ऑनलाइन पोर्टलद्वारे तालुकास्तरीय समितीकडे (TLC) पाठविण्यात येईल. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने तहसील कार्यालयात उपस्थित राहून स्वतःची ओळख निश्चित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. यामध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, ७/१२ उतारा तसेच अन्य आवश्यक ओळखपत्रांचा समावेश असेल.
तालुकास्तरीय समितीकडून संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून शेतकऱ्याची ओळख निश्चित करण्यात येईल. सादर केलेल्या कागदपत्रांतील आधार क्रमांक संबंधित लाभार्थ्याचाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर समितीकडून तक्रार मान्य करण्यात येईल आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वयस्कर तसेच बोटांचे ठसे न उमटणाऱ्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात योजनेच्या निकषानुसार कर्जमुक्तीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे.
दरम्यान, संबंधित विभाग व जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेबाबत तातडीने आवश्यक सूचना देऊन पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आधार प्रमाणीकरणातील तांत्रिक अडचणींमुळे कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती असलेल्या वृद्ध शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
