अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क –
भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे नवी दिल्ली येथील ‘इंडिया हॅबिटॅट सेंटर’ येथे दिनांक २४ आणि २५ ऑगस्ट २०२६ रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय ‘PMFME कॉन्क्लेव्ह’चे (परिषदेचे) भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्याला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत केंद्रस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयमार्फत पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी स्वीकारला. या वेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, अविनाश जोशी, केंद्रीय सचिव, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, देवेश देवाल, सहसचिव, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, कृषि संचालक विजयकुमार आवटे हे उपस्थित होते.

जिल्ह्यात या योजनेअंतर्गत १हजार ८५५ अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आले असून, अहिल्यानगर जिल्हा कृषी विभागाच्या ह्या अतुलनीय कामगीरी मुळे जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. पुरस्कारांच्या वर्गवारीत महाराष्ट्र राज्याचा देशात प्रथम क्रमांक येण्यात अहिल्यानगर जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी सरासरी प्रकल्प कर्ज ११.६८ लाख रुपये व सरासरी ४.२७ लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याच्या ह्या कामगीरी मुळे असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रियादार हे संघटित क्षेत्रात आल्याने बॅंक कर्ज उपलब्ध होण्यास व शासकीय योजनांचा लाभ घेता आला आहे.

अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीने रोजगारांची निर्मिती होत आहे. यामुळे जिल्ह्यात ७९ कोटी रुपयांचे अनुदान अन्नप्रक्रिया उद्योगांना वितरित झाले असल्याचे प्रतिपादन सुधाकर बोराळे यांनी केले. तसेच, जिल्ह्यात जास्तीत जास्त उद्योजक तयार करून तरुणासाठी रोजगाराच्या संधी जिल्ह्यातच उपलब्ध होत आहे असे त्यांनी नमूद केले.
पालकमंत्री मा ना. राधाकृष्ण विखे पाटील जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व बँका, कृषी विभागातील अधिकारी – कर्मचारी व जिल्हा संसाधन व्यक्तींनी संघभावनेने काम केले. परिणामी, अहिल्यानगर जिल्ह्याने केंद्र शासनाच्या स्तरावर पुरस्कार मिळवला.

