समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : स्थानिक गुन्हे शाखेने मोक्का गुन्ह्यासह दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत गाजलेल्या दरोड्यासह एकूण १० गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

१६ मे २०२६ रोजी अकोले तालुक्यातील औरंगपूर येथे पहाटे चार अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले. तसेच कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटून पोबारा केला होता. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे वाळकी परिसरात सापळा रचून अजय सादीश काळे (रा. वाळुंज) व अक्षय उर्फ सोन्या अर्पण भोसले (रा. घानेगाव, ता. पारनेर) यांना अटक केली.

चौकशीत आरोपींनी इतर साथीदारांसह दरोडा टाकल्याची कबुली दिली असून, चोरीतील दागिने एका व्यक्तीस विकल्याचेही सांगितले आहे. या गुन्ह्यातील सात आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
अटक करण्यात आलेला अजय काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे अकोलेसह जिल्ह्यातील एकूण १० गुन्ह्यांची उकल झाली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे
