योग्य पाणी-खत व्यवस्थापनातून गहू उत्पादनात वाढ, वाचा सविस्तर गहू पिकाचे खत पाण्याचे नियोजन.
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क –
गव्हाचे पीक जोमदार येण्यासाठी केवळ खतांचा अतिरेक न करता पाणी व खत यांचे योग्य नियोजन आणि अचूक वेळ साधणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीमुळे अनेकदा खतांचा अपेक्षित परिणाम मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, शास्त्रीय पद्धतीने पाणी व खत व्यवस्थापन केल्यास गहू उत्पादनात लक्षणीय वाढ शक्य आहे.
गव्हाच्या पेरणीनंतर साधारण १५ ते २० दिवसांनी, जमीन वाफसा स्थितीत आल्यानंतर पहिले पाणी देणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. या टप्प्यावर पिकाला दिलेली विश्रांती मुळांची वाढ वाढवते आणि फुटवे जोमाने येण्यास मदत करते. घाईने पाणी दिल्यास अपेक्षित फुटवे येत नाहीत, असे तज्ज्ञांचे मत आहे.
पीक २० ते २१ दिवसांचे झाल्यानंतर खताचा पहिला व सर्वात महत्त्वाचा डोस द्यावा. महागडी मिश्र खते वापरण्यापेक्षा युरिया व झिंक सल्फेटचा संतुलित वापर अधिक परिणामकारक ठरत आहे. एकरी १ बॅग युरिया (४५ किलो) व ५ किलो झिंक सल्फेट दिल्यास पिकाची शाकीय वाढ जोमदार होते. युरियामुळे वाढीस चालना मिळते, तर झिंकमुळे पिकाला हिरवेगारपणा येऊन फुटव्यांची संख्या वाढते.
खत देताना होणारी मोठी चूक म्हणजे खत टाकल्यानंतर उशिरा पाणी देणे. यामुळे उन्हामुळे युरिया वाया जातो व पिकाला फक्त २० ते २५ टक्केच लाभ मिळतो. खत टाकल्यानंतर दोन तासांच्या आत पाणी दिल्यास खताचा पूर्ण लाभ पिकाला मिळतो. आधी काही वाफ्यांमध्ये खत टाकून तात्काळ पाणी सोडणे ही योग्य पद्धत ठरते.
गव्हाला ५० ते ५५ दिवसांनी, तिसऱ्या पाण्याच्या वेळी दुसरा डोस देणे उपयुक्त आहे. यावेळीही एकरी १ बॅग युरिया व ५ किलो झिंक देण्याचा सल्ला देण्यात येतो. खत टाकणे शक्य नसल्यास नॅनो युरिया (५ मिली प्रति लिटर) व झिंक (१ ग्रॅम प्रति लिटर) एकत्र करून फवारणी केल्यास कमी खर्चात चांगला परिणाम मिळू शकतो.
गव्हासारख्या प्रमुख पिकासाठी गरज नसताना महागडी खते वापरण्याऐवजी योग्य वेळी युरिया व झिंकचा समतोल वापर केल्यास खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ साधता येईल, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.

